सेऊल. संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात आहे. या आजाराची उशिराने झालेली माहिती यामागील कारण आहे. मात्र दक्षिण कोरियामधील अमेरिकी सैन्याने या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी स्मेल टेस्ट सुरू केली आहे. यामुळे कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही हे स्पष्ट होते.
अमेरिकी सैन्याचे अधिकारी कॅरोल आणि हेन्री हे सैन्यतळाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि आजूबाजूच्या परिसरात ही चाचणी घेत आहेत. याशिवाय दक्षिण कोरियाच्या प्रमुख शहरांमध्येही ही चाचणी सुरू आहे. या प्रक्रियेत लोकांना सफरचंदाच्या व्हिनेगरचा वास घेण्यास सांगितले जाते. लोक याचा वास घेऊ शकत नसतील ही कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आहेत. या चाचणीतील संशयित रुग्णांची कोरोनाची लागण झाली आहे का? हे तपासण्यासाठी स्क्रीनिंग केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या वैद्यकीय संस्थांनीही कोरोना संसर्गित व्यक्तीची वास घेण्याची आणि चव समजण्याची क्षमता कमी होते हे मान्य केले आहे.
दक्षिण कोरियामध्ये देगूच्या सैन्यतळावर सर्वात आधी कोरोनाची स्क्रीनिंग सुरू झाली. येथे स्मेल स्क्रीनिंग टेस्टशिवाय तापमान तपासणे आणि प्रश्नांची उत्तरे देणे सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आले होते. यामुळे या बेस कॅम्पमध्ये अद्याप एकही प्रकरण समोर आलेले नाही. यानंतर देशातील इतर लष्करी तळांवर आणि मोठ्या शहरांमध्ये ही स्क्रीनिंग प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. गॅरीसन सैन्यतळाचे कमांडिंग अधिकारी एडवर्ड बॅलेंकोनुसार, या तत्परतेमुळे आमच्या बेसवरील एकाही सदस्याला कोरोनाची लागण झालेली नाही.
स्थानिक रुग्णालयांमध्येही होते अशी तपासणी, डब्ल्यूएचओकडून संशोधन
कर्नल बॅलेंको यांनी सांगितले, स्थानिक रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारे स्क्रीनिंग होत आहे. यात व्यक्तीला व्हिनेगरचा वास घेण्यास सांगितले जाते आणि काही प्रश्न विचारले जातात. दुसरीकडे डब्ल्यूएचोनेही वास आणि चव कळण्याच्या क्षमतेचा कोरोनाशी असलेल्या संबंधांवर संशोधन सुरू केले आहे.