न्यूयॉर्क. कोरोनामुळे जगभरातील कंपन्यांच्या कार्यपद्धतीत अपेक्षेपेक्षा जास्त बदल दिसून येत आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉनसारख्या बहुतांश कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य देत आहेत. गार्टनरच्या ताज्या अहवालानुसार ७४% सीएफओंनी सांगितले की, ऑफिसला न येता काम करण्याची ही पद्धत अपेक्षेपेक्षा जास्त उपयुक्त ठरत आहे. कार्यालयीन खर्च कमी करण्यासाठी ही व्यवस्था कायमस्वरूपी लागू करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
एवढेच नव्हे तर, ८१% सीएफओंनी सांगितले की, आगामी काळात वर्क फ्रॉम होमच्या स्वरूपासाठीच ते कर्मचाऱ्यांची भरती करतील आणि त्यासाठी वेगळे लवचिक धोरण स्वीकारू. तर २०% सीएफओच्या मते, वर्क फ्रॉम होममुळे त्यांच्या इमारतीवरील आणि प्रवास खर्चात मोठी बचत होईल. मात्र, यामुळे व्यवसायातील सातत्य आणि उत्पादकता यावर परिणाम होईल, असे ७१% सीएफअोंना वाटते. एकूण ३१७ सीएफओंच्या सर्वेक्षणात बहुतेकांनी मान्य केले की, कोरोनाचा संसर्गकाळ हा व्हर्च्युअल ऑफिसच्या दिशेने मैलाचा दगड ठरणार आहे. तर काही कंपन्या लॉकडाऊननंतर वर्क फ्रॉम होम पद्धती कायमस्वरूपी लागू करण्याची शक्यता आहे. अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉनसारख्या बड्या कंपन्या अमेरिकेत आपल्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम करून घेत आहेत. टि्वटर आणि गुगलने तर जगभरातील आपल्या केंद्रात पुढील आदेशांपर्यंत याच पद्धतीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मायक्रोसॉफ्टने सोमवारी सिएटल आणि सॅनफ्रान्सिस्कोनंतर पूर्ण अमेरिकेत घरातूनच काम करण्याचे आदेश दिले आहेत.
वर्क फ्रॉम होमच्या संस्कृतीतून नवी संकल्पना रुजेल : संशोधक
टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी लॉकडाऊनमधील वर्क फ्रॉम होमचे फायदे सांगणारे टि्वट केले आहे. यात संशोधनाचा हवाला देत म्हटले आहे की, या संशोधनात २०१८ मध्ये घरून काम केल्याच्या काळातील वीज, इंधनाची बचत आणि पर्यावरणाला होणाऱ्या फायद्याविषयी सांगितले होते. वर्क फ्रॉम होमच्या कार्यसंस्कृतीतून धडा घेत नवी संकल्पना रुजवण्याची गरज असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.